नरकचतुर्दशी

दिवाळीच्या दिवसांत नरक चतुर्दशी हा एक दिवस आहे. दिवाळीतील अभ्यंगस्नान ज्यादिवशी केले जाते, तो हा दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी येते. यादिवशी पहाटे यमासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे, असे मानले जाते. नरकासुर राक्षसाचा यादिवशी वध झाल्याने हा दिवस साजरा करतात. यादिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. यादिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना अन्नपदार्थ आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. यादिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल घालतात. दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करतात. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करतात.
याबाबत एक कथा सांगितले जाते की, पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देवतांसह मानवांना फार त्रास देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवून त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले. त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. हा आश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस ‘नरक चतुर्दशी’ म्हणून साजरा करतात. लोक त्यादिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. यादिवशी गावांमध्ये भल्या पहाटे उठून अंगणातील तुळशीवृंदावनासमोर कारिंटे फोडून गोविंदा नावाचा जयघोष करतात. नरकचतुर्दशीला अंगाला तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. देवाची पूजा करुन गोड-तिखट पोहे व दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतात.
वसुबारसेपासून सुरु होऊन भाऊबीजेला किंवा देवदिवाळीला दिवाळी संपते. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नरक चतुर्दशीचा दिवस अनेक अर्थांनी वेगळा ठरतो. त्यादिवशी किंवा त्या दिवसामुळे कृष्णाने शोषितांवरचा अन्याय दूर करण्यासाठी पारंपरिक विचारसरणीला तिलांजली दिली. स्त्रियांच्या मानसन्मानाचा आणि स्वत्वाचा आदर करण्यासाठी तत्कालीन समाजमान्यतेला छेद देणारा क्रांतिकारी निर्णय घेतला. दुर्दैवाने आज हजारो वर्षांनंतरही स्त्रीला केवळ एक भोग्य वस्तु मानणारी एक नरकासुरी प्रवृत्ती आज अस्तित्वात आहे. न्याय, बंधुता आणि समानता या तत्वांवर चालणाऱ्या समाजाची आज गरज आहे. यादिवशी प्रत्येकाने आपल्यातील नरकासूर वृत्तीला तिलांजली देणे गरजेचे आहे. सणांमधून अभिप्रेत असलेला अर्थ आपण घेतला पाहिजे. केवळ परंपरा म्हणून सण साजरे करण्यात काहीही अर्थ नाही. दिवाळी हा प्रकाशाचा सण ! सुविचारांनी, चांगल्या कृतींनी तो अधिक प्रकाशमय करुया.