कोवळे गाजर
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून, कच्ची खाण्यासाठी तसेच जनावरांचे खाद्य म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, कोशिंबीर, लोणची, हलवा , जॅम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. गाजराच्या चकत्या सुकवून त्या साठविल्या जातात. गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से. तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिकट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो; परंतु गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.

गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्हणून गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ-भुसभुशीत असावी. भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करुन जमिन भुसभुशीत करावी. गाजराच्या लागवडीसाठी खोल, भुसभुशीत, गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमिन निवडावी. ‘पुसा केसर’, ‘नानटीस’, ‘पुसा मेधाली’ या गाजराच्या सुधारित जाती आहेत. महाराष्ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट ते डिसेंबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्यात करतात. गाजराच्या लागवडीसाठी जमिन खोल उभी-आडवी नांगरुन घ्यावी. जमिन सपाट करुन घ्यावी. बी सरी-वरंब्यावर पेरावी. दोन वरंब्यातील अंतर 45 सेमी. ठेवावे. बियाची टोकून पेरणी करताना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर ‘टोकन’ पध्दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरताना दोन ओळीत 30 ते 45 सेमी. अंतर ठेवावे. नंतर ‘विरळणी’ करुन दोन रोपांतील अंतर 8 सेमी ठेवावे.
एक हेक्टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. बियाणे उगवून येण्यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवल्यास हा काळ कमी करता येतो. गाजराच्या पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र, 60 किलो स्फूरद, आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार 20 ते 30 गाड्या शेणखत जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.

बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमिन तयार झाल्यावर वाफे आधी ओलावून घ्यावेत आणि वाफसा आल्यावर बी पेरावे. पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसांच्या कालावधीत जमिनीत चांगला ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे; म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्याचे प्रमाण जास्त झााले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते. गाजराच्या पिकावर ‘साड्या भुंगा’ , सहा ठिपके असलेले ‘तुडतुडे’ आणि ‘रूटफ्लाय’ या किडीचा उपद्रव होतो. गाजराची काढणी बियाण्याच्या पेरणीनंतर 70 ते 90 दिवसांत करतात. गाजरे चांगली तयार व्हावीत, म्हणून काढणीपूर्वी पिकाला 15 ते 20 दिवस पाणी देण्याचे बंद करावे. कुदळीने खोदून, हाताने उपटून किंवा नांगराच्या सहाय्याने गाजराची काढणी करावी. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. लहानमोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत. गाजराचे उत्पादन हेक्टरी 8 ते 10 टन इतके मिळते.